आगोट.... - स्नेहा शिंदे

CRIME BORDER | 15 September 2022 08:19 AM

 आगोट.... - स्नेहा शिंदे क्राईम बॉर्डर साहित्यिक कट्टा

दिवे लागणीची वेळ, बाहेर मी म्हणणारा पाऊस पडत होता. जिकडे तिकडे पाणी पाणी झालं होत. म्हातारी आपल्या खोपट्याच्या दाराशी उभी राहून बाहेरचा कानोसा घेत होती. बाहेरच्या मिट्ट काळोखात बिचाऱ्या  म्हातारीला काय दिसणार होत. तरी पण जीव राहत नाही म्हणून पुन्हा पुन्हा बिचारी दाराशी जाऊन पाहत होती. शेवटी दाराशीच बसून स्वतःशीच पुटपुटू लागली

" देवा बावा कधी येईल र माझी बाय ? ह्या मेल्या पावसावर पन आजच झडी आलीय जरा थांबला तर काय होईल मेला माझ्या पोरीला पुरता भिजवून सोडलं हा कार्टा ! "

डोक्याला लावलेला हात कपाळावर आपटून घेत म्हातारी पावसाला शिव्या देऊ लागली. इतक्यात दूरवरून पुसटसा कंदिलाचा उजेड दिसल्याचा भास तिला झाला. ती आशेन तिकडे पाहू लागली

" बाय आलीस काय ग ?" ती नातीला हाका मारू लागली. 

"आग आये किती येला सांगितलय तुला कि अशी दारात बसत जाऊ नको पावसाची जीवान फिरत असतात तुला दिसत नाय तरी माझं एक ऐकशील तर शपथ ! "अनु बडबड करतच आत शिरली. 

"बाहेर मेला पाऊस मी म्हणतोय तिनसांची वेल त्यात माझी पोर बाहेर आनि मी काय शांत झोपून ऱ्हाव काय ? माझी पोर घरात आल्याशिवाय माझ्या मेलीच्या जीवाला काय शीतलाय येत नाय बघ!" 

"आये आये आता तरी जरा शांत बस मी आंघोळ करून घेतो आणि मग करता काय तरी खायला पण तू जरा शांत बस बर वाईच." अनु आजीला कोपऱ्यात बसवत म्हणाली.

"व्हय आता आली ना बाय माझी आता मी बापडी बसते गप तू काय मला आता बोलू द्यायचीयस काय ?" म्हातारी अनुच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. 

"थांब तुला वाईच चाय देतो आणि मग जातो आंघुळीला बस हिकडं." 

अनु चुलीजवळ जाऊन चूल पेटवू लागली. आजूबाजूला पावसाचं पाणी गळल्याने चुलीतली लाकडं काही पेट घेत नव्हती. झोपडीभर धूर झाला. त्या धुराने म्हातारीला खोकल्याची उबळ आली. अनुने धावत जाऊन तिला पाणी पाजलं. तिच्या पाठीवरून हात फिरवत अनु तिला धीर देत होती. 

म्हातारी खोकत खोकत बोलू लागली " तू जा बाय पाण्याचं तपेल दुपारपासन निखाऱ्यांवर ठेवलं होत कोमट झालं असलं पाणी जा तू आंघोळ करून घे. मरूदे ती चाय वल बघ किती झालयस त जा लवकर."

"व्हय ग आये जातंय तू पाणी पी.  मी लगेच येतो आंघोळ करून विस्तव पण धुमसून पेटलं तोपर्यंत. "अनु बोलत बोलत मागच्या दाराशी पोहचली सुद्धा.

 आंघोळ झाल्यावर अनुने चहा बनवला आजी आणि अनु चहा पित बसल्या होत्या.

"बाय उद्या गणपती येणार ना ग काय करायचं आपण. आपली हि अशी दरिद्री अवस्था आपल्या देवाला आपण काय करून घालणार ग ? तू पण शाला सोडून लोकांच्या शेतात राबतस ह्या म्हातारीचं लोढणं तुझ्या गळ्यात नसत तर काय तरी केलं असतंस ग बाय तू." म्हातारी पदर डोळ्याला लावत म्हणाली.

"आये अग का असं बोलतेस ? तुझ्याशिवाय मला ह्या जगात हाय तरी कोण ग ? तू माझ्यासाठी अन मी तुझ्यासाठी हाय म्हणून तर जगताव हाय ना ग आपण दोघ जण? आणि तूच जर असं बोलायला लागलीस तर कस व्हायच माझं ? कोण कुठची मी पोर तू मला आधार नसता दिलास तर आज जीती तरी असती का ग मी ? कोल्या कुत्र्यांनी फाडून कधी खाऊन टाकलनी असत मला.  तू हायस म्हणून मी हाय आणि तू म्हणतेस तू माझ्या गळ्यातला लोढणा हायस म्हणून ." अनु हुंदके देत म्हणाली. 

म्हातारीनं तिला कुशीत घेतल " गप ग बाय बोलता बोलता बोलून गेलो मी. तुझे हे हाल बघवत नाय ग मला चांगली शिकून सवरून सायबीन झालेली बघायची व्हती बघ ह्या म्हातारीला तुला पण किशात आना नाय माझ्या कस अन काय करू अंगात ताकद होती तोवर कस बस करून पाठवलं तुला  शाळत पण आता काय व्हय ना बघ ह्या म्हातारीच्यान."

"अग आये दहावी शिकवलंस तू मला आणि किती करशील ?  आता पुढच्या शिक्षणासाठी थोडं कष्ट पडतील  ते करीनच बघ मी पण तुला हि तुझी लेक सायबीन होऊन दाखवील एक दिवस एवढं नक्की."

"गुणांची ग बाय माझी तुला एकदा सायबीन झालेलं बघितलं का मी डोळ मिटायला मोकळी बघ."

"काय तरी असत तुझं आये सायबिणीची आये म्हणून मिरवायचं नाय काय तुला ? लगेच आपले डोल मिटायची घाय." अनु म्हातारीला चिडवत म्हणाली.

"तूच ग बाय माझा आधार.लेका सुनांनी घराबाहेर काढल्यावर म्हाताऱ्याला घेऊन जिद्दीनं हि झोपडी बांधून राहिली. माझा म्हातारा अगदी मरायला टेकला होता तेव्हाच त्या पोरांनी घराबाहेर हाकलले ह्या दोन म्हाताऱ्याना. त्यांना वाटलं म्हातारी भीक मागत परत येईल आणि आयती कामाला  बाई मिळल.  पण मी पण काय कमी खमकी बाई नव्हतो नाय तर नाय गेलो परत म्हाताऱ्याला शेतात झोपवून एकट्यानं हि झोपडी बांधली. व्हइल तशी सेवा केली म्हाताऱ्याची. शेवटला म्हातारा पण रडला हात जोडून माझी माफी मागत म्हणाला माफ कर मला तुला हक्कच घर पन नाय देऊ शकलो मी. मला भरून आलं बाय ह्यात त्या बिचार्याचा कायच दोष नव्हता ग पण जाताना मनात सल घेऊन गेला माझा म्हातारा." म्हातारी हुंदके देत बोलत होती. 

"आये अग राहूदे बर आता कशाला परत त्याच त्या गोष्टी बोलायच्या, तुला आणि त्रास."

"नाय बाय आज बोलूदे मला माझ्या म्हाताऱ्याचा लय जीव होता माझ्यावर कधी कशाची कमी नाय पडू दिली मला. पण सुना लेकांच्या राज्यात आमचं काय चालनास झालं बग. पण शेवटला माझ्या म्हाताऱ्याला मीच अग्नी दिला एका पोराला शिवू दिल नाय मी त्याला. आणि मी मेल्यावर पण कोणाला शिवू नाय द्यायचं तूच मला अग्नी द्यायचा." म्हातारी अनु ला बिलगत म्हणाली.

"गप आता आये उद्या गणपती यायचेत घरात आणि आज अशी रडतेयस काय. चल मी पटकन पिठलं भात करतो आपण खाऊन घेऊ आणि झोपू सकाळी लवकर उठून मग गणपती आणायला जायचंय ना. घर सारवायचंय बाप्पाला बसायला आरास करायचीय किती कामे आहेत बघ. तू आता शांत बस बर.  मी पटापट जेवण बनवतो अन हाक मारतो तुला तू आडवी हो तोपर्यंत." म्हातारीनं मान डोलली अन ती एका कोपऱ्यात झोपली.

थोड्याच वेळात अनुन पिठलं भात बनवला. दोघीजणी जेऊन झोपी गेल्या. बाहेर पावसाची रीप रीप चालूच होती. सकाळी तरी हा पाऊस थांबेल कि नाही ह्याची चिंता अनुला लागली होती. गणपती साठी साठवलेले पैसे पुरे पडतील ना ह्याच चिंतेत तिला कधी गाढ झोप लागली हे तीच तिलाच कळलं नाही.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच अनु उठली वाडीत जाऊन तीन शेण आणलं फुले गोळा केली. शेणानं सगळी झोपडी सारउन घेतली. रांगोळी काढली आणि आंघोळीला गेली. आंघोळीवरून येईपर्यंत म्हातारी पण उठली होती. अनुने तिला पण आंघोळीला पाणी दिल आणि ती बाकी सगळी तयारी करू लागली. म्हातारी अंघोळीवरून आल्यावर तीन तिला चहा दिला अन मग गणपती आणायला ती तालुक्याच्या गावी जायला निघाली. 

"बाय पैस हायत काय गे ? देवापुरते तरी हायत ना गे ?"

"हायत ग आये तू नको काळजी करू तो आहे ना तो सगळं बरोबर करून घेईल बघ आपल्याकडून मी लवकर जाऊन लवकर येतो बघ." अनु झोपडीबाहेर पडत म्हणाली.

"सावकाश जा ग बाय ." म्हातारी तिला आवाज देत म्हणाली.

सकाळचे दहा वाजले होते अनु बाप्पाची मूर्ती घेऊन दूरवरून चालत येताना म्हातारीनं पाहिलं. कालपर्यंत धड उठून उभी राहता न येणारी म्हातारी आज कोण्या उत्साहाने उठून उभी राहिली. ती पटकन आत गेली आरतीचं ताट तयार करून पाण्याचा तांब्या भरून ती झोपडीच्या दारात येऊन उभी राहिली. अनु दारापाशी येऊन उभी राहिली म्हातारीनं तिचे पाय धुतले बाप्पाला ओवाळून तीन अनुला आत बोलावलं. अनुने मूर्ती पाटावर ठेवली आणि ती देव्हाऱ्या शेजारी बाप्पाला बसवण्याची तयारी करू लागली. तिने सावकाश बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि ती स्वयंपाकाला लागली. 

म्हातारी बापाशेजारी बसून त्याला न्यहाळत होती. आपल्या अंधुकश्या नजरेनं ती बाप्पाची मूर्ती हृदयात साठवून घेत होती. 

"पुढच्या वर्षी तुला बघीन का नाय माहित नाय म्हणून आताच तुला बघून घेते रे देवा माझ्या पोरीला सुखी ठेव दुसरं काय मागन नाय बग." म्हातारी बाप्पाला हात जोडत पुटपीटली.

अनु चुलीजवळून सार ऐकत होती तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. एक दिवस म्हातारीच स्वप्न पूर्ण करायचंच असा मनाशी ठाम निश्चय करून ती कामाला लागली.  

गणपतीचे चार दिवस हा हा म्हणता सरले. चटणी भाकरी का होईना पण जमेल तस आणि तितकी देवाची सेवा करून अनु आणि म्हातारी खुश होती. शेवटी बाप्पाला निरोप द्यायची वेळ झाली दोघींचाहि कंठ दाटून आला. आरती करून झाली आणि अनु बाप्पाचं विसर्ज करण्यासाठी चालली. म्हातारी झोपडीच्या दाराशी बसून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. अनु जड अंतकरणाने बाप्पाला निरोप द्यायला पाण्यात उतरली. तिला हातातून बाप्पाला सोडवेनासे झालं.  पाण्यात विसर्जित मूर्तीकडे बघताना तिला तिचे अश्रू अनावर झाले. हातातला  पाट आणि त्यातल्या खड्यांवरून हात फिरवत ती झोपडीकडे जायला निघाली. अजूनही पाण्यातली बाप्पाची मूर्ती तिच्या नजरेसमोर तरळत होती. ती स्वतःशीच पुटपुटली गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !

समाप्त

- स्नेहा शिंदे.