आई, आज तू हवी होतीस - निलू उर्फ निलेश कल्पनाताई अशोक पाटील

आई तुझं लेकरू, येडं गं कोकरू, रानात अडकलंय, रस्ता भटकलंय… आई, तू आता अनंतात विलीन झाली आहेस त्यामुळे माझे हे शब्द तू आता नक्कीच ऐकत असशील? आई दि. ०१ मे २०२४ आज तुझी ६५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने
तू हे जग सोडून तुझ्या पुढच्या प्रवासाला गेलीस तो क्षण माझ्यासाठी कसा होता हे आठवताना खूप त्रास होतो. त्या क्षणी मी काय अनुभवलं, मला काय वाटलं कसं सांगणार शब्दात. पण तो क्षण धैर्याने सामोरा जाण्याचं बळ मात्र तूच मला दिलं होतंस. माझ्यामध्ये असलेला आत्मविश्वास, स्पष्टवक्तेपणा, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याची वृत्ती तूच लहानपणापासून दिलेल्या शिकवणीतून आली आहे. तू मला नेहमी पुढेच जायला शिकवलंस.खरंतर तू गेलीस त्या क्षणी मला काहीच समजत नव्हतं.
एखाद्याच्या जीवनात आईविना एखादा दिवस येण्यासारखं दुसरं दुःख नाही. तू गेलीस त्यानंतर माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. मला जन्म देताना तूला जितक्या वेदना झाल्या तितक्याच वेदना मला तूला निरोप देताना झाल्या.
फरक फक्त इतकाच तुझ्या आनंदकळा होत्या आणि माझ्या विरहकळा. तुझ्या अस्थींना निसर्गाच्या ताब्यात देताना पाण्यावर तरंगणाऱ्या अस्थीकडे पाहून मनात प्रश्नांचा भडीमार झाला होता. तुझ्या अस्थीचा तो भाग नेमका कोणता असेल ? कधीकाळी मी या भागाला स्पर्शून जन्माला आलो असेन का ? मला जन्म देणारा हा शेवटचा अवयव वजा भाग आता निसर्गाच्या स्वाधीन करायचा हा विचारच माझ्यासाठी त्रासदायक होता.
तू जाताना मला घट्ट मिठी मारुन माझ्या गालावर जेव्हा प्रेमाने पापा घेतलास तो क्षण मी कधीच विसरु शकणार नाही. कारण तो माझ्या आयुष्यातील एक वेगळाच क्षण होता. आता या क्षणी देखील मी तुझी जाणिवपूर्वक आठवण काढत नसून तू माझ्या सदैव स्मरणात आहेस याचीच जाणीव मला होतेय.
आई आज माझ्याकडे सर्वकाही आहे पण ते सर्व सुख बघायला ,उपभोगायला माझे जन्मदाते आई बाबा नाहीत याची सल मात्र मला कधी कधी स्वस्थ बाबासु देत नाही मन अगदी बेचैन होतं .... आई यालाच जीवन म्हणतात का गं बाबा सांगा ना ?
तुमचाच निलू उर्फ निलेश कल्पनाताई अशोक पाटील