दुसऱ्या मुलाबरोबर मैत्रीण फिरताना दिसली, अल्पवयीन मुलानं केली आत्महत्या

सातारा - मैत्रीण दुसऱ्या मुलाबरोबर फिरताना दिसल्यानं एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं पालक वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. संबंधित मुलाच्या भावाने घटनेची खबर दिली असून सातारा शहर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
आत्महत्येपूर्वी मोठ्या भावाला केला होता फोन - याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. अल्पवयीन मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी मोठ्या भावाला फोन केला होता. माझे एका मुलीवर प्रेम असल्याचे त्याने भावाला सांगितले होते. तसेच माझे तिच्यावर प्रेम होते. ती आज दुसऱ्या मुलाबरोबर फिरताना मला दिसली. तिने मला धोका दिला आहे. मी आता जगणार नाही, असं सांगून त्याने फोन कट केल्याचीही माहिती समोर येतेय.
भावाला मृतदेह आढळून आला - फोन कट झाल्यानंतर मोठ्या भावाने वारंवार फोन केले. परंतु, त्याचा फोन बंद येत होता. त्यामुळे मोठ्या भावाने मित्राच्या मदतीने लहान भावाचा शोध सुरू केला. रात्री साडेआठच्या सुमारास जानाई-मळाई डोंगराच्या पायथ्याला एका ओढ्याशेजारी त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मोठ्या भावाने सातारा शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून हवालदार खाडे हे अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.
लहान मुलं का उचलतात टोकाचं पाऊल? - अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येच्या घटनांबद्दल डॉ. दिलीप सोलंकी म्हणाले की, हल्लीच्या मुलांना आई-वडील किंवा शिक्षक काही बोलले तर मुलांना तो अपमान वाटतो. अशावेळी मुलं कोणत्या टोकाला जातील ते सांगता येत नाही. त्यामुळं मुलगा वा मुलगी असो, सुरुवातीला रागवलं तरी शेवट मात्र प्रेमाने करावा. हल्लीच्या मुलांची वैचारिक प्रवृत्ती बदलली आहे. अल्पवयीन मुलं लगेच टोकाचं पाऊल उचलतात. त्यामुळं चुकीसाठी मुलांना जरूर रागवले पाहिजे, परंतु, शेवटी गोड बोलून त्यांना समजावणे देखील गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.sabhar etv bhart