पळून जाऊन उच्च शिक्षित मुलीनं केला प्रेमविवाह, आईनं विष पिऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना

CRIME BORDER | 10 July 2025 08:20 AM

सातारा : एका उच्च शिक्षित मुलीनं गावातीलच युवकासोबत पळून जाऊन लग्न केलं. यामुळे तणावात येऊन आईनं विष पिऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यात घडली. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मुलीनं पळून जाऊन लग्न केलं : प्रेमी युगुलाचं अनेक वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण त्यांच्या नात्याला कुटुंबाचा पाठिंबा मिळणार नाही, या भितीनं दोघांनीही 22 जूनला गाव सोडलं. त्यानंतर दोघांनी नोंदणी पद्धतीनं विवाह उरकला. पण इकडं मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आई-वडिलांनी सातारा तालुका पोलिसांमध्ये नोंदवली.

पोलिसांनी प्रेमी युगुलाला शोधून काढलं : तक्रार मिळताच, पोलिसांनी लगेच कारवाईला सुरुवात केली आणि प्रेमी युगुलाला शोधून पोलीस ठाण्यात आणलं. मात्र, त्यांनी एकमेकांच्या मर्जीनं रजिस्टर लग्न केल्याचं समोर आलं. पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. दोघंही सज्ञान असल्यानं सुखाचा संसार करू द्या, आडकाठी करू नका, असा सल्लाही दोन्ही कुटुंब प्रमुखांना दिला.

मुलीच्या आईनं केली आत्महत्या : पण आपल्या उच्च शिक्षित मुलीनं पळून जाऊन लग्न केलं. त्यामुळे समाज आणि नातेवाईकांमध्ये आपली प्रतिष्ठा जाईल, या विचारानं आईला नैराश्य आलं. त्यातूनच मुलीच्या आईनं मंगळवारी (24 जून) पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सगळीकडं वाऱ्यासारखी पसरली आणि सातारा तालुक्यात एकच खळबळ उडाली. या घटनेची नोंद सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं? : दरम्यान, या घटनेबाबत सातारा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, "ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच दोन्ही कुटुंबीयांचीही समजूत घालण्यात आली असून मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे".sabhar etvbhart