म्हस्कळ येथील जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित आश्रम शाळेत राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

राजेंद्र वखरे यांजकडून
“अच्छे काम करते रहिये चाहे लोग तारीफ करें या न करें आधी से ज्यादा दुनिया सोती रहती है ‘सूरज’ फिर भी उगता हैं.”
डोंबिवली - : सामाजिक समस्यांनी व्यथित अशा बेघर मुलांचे पुनर्वसन करून आत्मनिर्भर समाजाच्या निर्मितीसाठी सुदृढ समाज मनाची युवाशक्ती निर्माण करणे हे ध्येय घेऊन जीवन संवर्धन फाउंडेशन , कल्याण ही संस्था २०१० मध्ये बेघर मुलांच्या पुनर्वसनासाठी सदाशिव चव्हाण यांनी सुरू केली .
मुंबईतील प्लॅटफॉर्मवर रस्त्यावर राहून आपली उपजीविका करणारा खूप मोठा वर्ग आपल्या दृष्टीस आढळतो . यामध्ये लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. अशांची संख्या जास्त आहे . चोऱ्या करणे ,भिक मागणे हेच आपल्या उपजीविकेचे साधन त्यामुळे बनत असते . अनिर्बंध वातावरणामुळे लहान वयातच ही मुले विविध प्रकारच्या आमली पदार्थांच्या आहारी जातात. त्याचबरोबर त्यांचे लैंगिक शोषण होते आणि अशा प्रकारे एका संपूर्ण पिढीचे भविष्य अधांतरी व अंधकारमय होत असते तसेच संपूर्ण पिढी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावली जाते.
भयंकर असलेली ही सामाजिक समस्या लक्षात घेऊन जीवन संवर्धन फाउंडेशन या बेघर मुलांसाठी कार्यरत आहे. अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य संस्कार यापासून वंचित असलेल्या व बेघर मुलांना राहण्यासाठी आपुलकीचे माझे घर ,पोटभर अन्न ,योग्य शिक्षण ,आरोग्य व सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजातील अराजगते पासून सुरक्षितता या सर्व सेवा जीवन संवर्धन फाउंडेशन अशा मुलांना मोफत उपलब्ध करून देते.
संस्थेचे काम सध्या टिटवाळा ,ठाणे ,बदलापूर या तीन ठिकाणी सुरू आहे गुरुकुल मध्ये सुमारे ४ ते २४ वर्षे वयोगटातील दीडशे मुलांच्या राहण्याची जेवणाची व शिक्षणाची व्यवस्था केली जाते. प्रेम ,जिव्हाळा , शिस्तीसह शिक्षणाच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवला जातो.
अशा या संस्थेमध्ये दरवर्षी अर्थात सालावादाप्रमाणे राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीमार्फत येथील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य ,छत्री यांचे वाटप करण्यात येते.यावर्षी सुद्धा महा समितीमार्फत या ठिकाणी साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुदामजी पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे हे होते. महासमितीचे ठाणे जिल्हा समन्वयक ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुदामजी पाटील , क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे, ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी व आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आपले मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावरील अतिथींचे संस्थेच्या वतीने संस्थेच्या अधीक्षिका गीतांजली अहिरे यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाला बांबू प्रकल्पाच्या ठाणे जिल्हा प्रमुख माया सांगळे ,पत्रकार साईनाथ ठाकरे, पत्रकार तानाजी लोणे, सहशिक्षक आकाश पाटील ,विनोद अभ्यंकर ,प्रसाद आचरेकर ,अभिजीत घोडके व ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांनी आपले मनोगत व्यक्त्यांना विद्यार्थ्यांना सांगितले की आपण सुद्धा भविष्यामध्ये मोठे होऊन चांगल्या नोकरीवर लागा व आपल्या कमाईतील थोडा हिस्सा सामाजिक कार्यासाठी वापरा.
तर ज्येष्ठ पत्रकार सुदामजी पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, पत्रकार महासमिती ही दरवर्षी खारीचा वाटा उचलते . विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेऊन उच्च शिक्षण घ्यावे व उच्च पदावर नोकरी करून आपणही सामाजिक बांधिलकी जपावी.
त्याचबरोबर क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थी मित्रहो आपण एकटे नसून तुमच्याबरोबर संस्था व समाज आहे आपण उच्च शिक्षण घेऊन एमपीएससी व यूपीएससी अशा उच्च दर्जाच्या परीक्षा देऊन प्रशासनामध्ये जावे व शेवटच्या घटकापर्यंत प्रशासनाच्या योजना राबवाव्यात व समाजाला योग्य तो न्याय द्यावा.
संस्थेच्या अधीक्षिका गीतांजली मॅडम यांनी उपस्थितांचे व समितीचे आभार व्यक्त केले.