शिवभक्त आदिवासी आश्रम शाळा,लव्हाळी,येथील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

राजेंद्र वखरे यांजकडून
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात ग्रामीण भागात वसलेली शिवभक्त अनु. आदिवासी आश्रम शाळा, लव्हाळी ,तालुका अंबरनाथ या शाळेत आदिवासी विद्यार्थी जवळपास साडेपाचशेच्या वर शिक्षण घेत आहेत .या ठिकाणी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिकत असून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन व शिक्षक वृंद मेहनत घेताना दिसतात.
सुसज्ज इमारत, स्वच्छ परिसर व शिस्तबद्ध शिक्षण हे या शाळेचे वैशिष्ट्ये आहे. या शाळेत आदिवासी विद्यार्थी शिकत असले तरी त्या विद्यार्थ्यांकडे बघून कोणीही म्हणणार नाही की, हे आदिवासी विद्यार्थी आहेत. कारण या सर्वांचा शैक्षणिक, शारीरिक , मानसिक संतुलन राखण्यात येतो. त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यात येतात . त्याचे राहणीमान टापटीप असून विविध अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवल्या जातात.
अशा या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना सालावादाप्रमाणे राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीचे ठाणे जिल्हा समन्वयक ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांनी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
सदर कार्यक्रम हा शाळेच्या सुसज्ज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आलेल्या अतिथींचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. तसेच मुख्याध्यापिका सौ.सायली बुटेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जवळजवळ क्लॅप च्या १२ पद्धती वापरून पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले.
सर्वप्रथम मान्यवरांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .सायली रमेश बुटेरे यांनी प्रास्ताविक मांडून शाळेबाबतची इत्यंभूत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुदामजी पाटील हे होते.आयोजक ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी , तर प्रमुख अतिथी म्हणून क्राईम बॉर्डरचे मुख्य संपादक तथा डोंबिवली विष्णूनगर पोलीस स्टेशन च्या शांतता कमिटीचे सदस्य राजेंद्र वखरे व बांबू प्रकल्पाच्या ठाणे जिल्हाप्रमुख माया सांगळे तसेच पत्रकार तानाजी लोणे पत्रकार साईनाथ ठाकरे ,या कार्यक्रमाला पत्रकार शिवाजी भगत समाजसेवक नाथा पुजारी गोशाळेचे व्यवस्थापक गायकर ,शाळेचे शिक्षक वृंद चंद्रकांत तारमळे, नीता गायकर ,अनंता देसले, किरण बाविस्कर व ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली . उपस्थित मान्यवरांचे शाळा व्यवस्थापनाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर समितीच्या वतीने सुद्धा पत्रकार सुरोशी यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांना प्रोत्साहित केले.
ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना सांगितले की, समितीच्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांसाठी थोडीफार मदत करीत असतो . या शाळेतून जर कोणी विद्यार्थी पुढे भविष्यात एमपीएससी किंवा यूपीएससी परीक्षेला बसत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही मदत करू परंतु विद्यार्थ्यांनी शिकून देशाचे उत्तम नागरिक बनावे असे सांगितले.
क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या व्यासपीठावर जे अतिथी बसलेले आहेत त्या ठिकाणी पुढील येत्या काही काळामध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांनी यूपीएससी ,एमपीएससी करून अधिकारी बनावे व या कार्यक्रमाला अतिथी म्हणून यावे याच्यासारखा शाळेसाठी आनंदाचा क्षण नसेल.
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार सुदामजी पाटील म्हणाले की शाळेचे व्यवस्थापन हे अतिशय उत्कृष्ट कार्य करत असून शिक्षक वृंद हे मेहनत घेऊन विद्यार्थी घडवत आहेत. नक्कीच शाळेचे विद्यार्थी, शाळेचे व शिक्षकांचे नाव मोठे करतील यात शंकाच नाही.
उपस्थित विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील अतिथींच्या हस्ते शालेय साहित्य व छत्री सप्रेम भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्य व छत्री मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . सायली रमेश बुटेरे या स्वतः जातीने प्रत्येक कामात मदत करत असतानाचे चित्र पाहायला मिळाले. शिवभक्त अनु. आदिवासी आश्रम शाळेतील शिस्त बघून सर्व अतिथींनी शाळेचे व शिक्षक वृंदांचे तसेच व्यवस्थापनांचे तोंड भरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ उमावणे यांनी केले तर आभार ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांनी मानले