छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CRIME BORDER | 9 July 2025 11:45 AM

मुंबई, दि. ९ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींवर झालेला अत्याचार ही अतिशय गंभीर बाब आहे. यामध्ये जे प्रकार उघड झाले आहेत, ते भयावह आहेत. यासंदर्भात दोषींवर कठोर कारवाई करत संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यासंदर्भात विधान परिषद सदस्य श्रीमती चित्रा वाघ आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अल्प सूचना प्रश्नाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याप्रकरणी चौकशीसाठी तीन वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक यांच्या समितीची स्थापना करण्यात आली असून त्यांनी ८० मुलींशी संवाद साधला आहे. सुरुवातीला त्या बोलायला तयार नव्हत्या, मात्र हळूहळू त्यांनी या प्रकरणाबाबत काही गंभीर माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर संबंधितांवरही कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. यावरील समितीचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होणार असून, त्यानंतर दोषी ठरलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल.

उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेतली असून, विशेष निरीक्षकाची नियुक्ती केली असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीसोबतच सरकार स्वतंत्रपणे चौकशी करत आहे. यामध्ये कोणतीही व्यक्ती, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

000