अभिनेत्री अलका कुबल यांच्यासोबत संवाद मनांचा

ठाणे (व्ही.शिवम) : आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय,ठाणे यांच्या वतीने लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी संवाद मनांचा हा उपक्रम दि.१४ एप्रिल पासून राबविण्यात येत आहे.यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञमंडळी विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतात. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवणे तसेच विविध क्षेत्रातील आव्हानांची व संधींची त्यांना जाणीव करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.नुनुकत्याच या उपक्रमाच्या २३ व्या पुष्पात ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सौ.अलका कुबल-आठल्ये यांनी सहभाग घेत त्यांचा जीवनप्रवास उलगडला.
भावूक भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून जरी प्रसिद्ध झाले असले तरी तेव्हा प्रत्येक घरातील तरूण-वृद्ध या सर्वांनी तेवढंच प्रेम दिलं असे सांगत त्यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले.आजच्या तरुण मुलींनी अभिनय क्षेत्रासोबतच इतर क्षेत्रात देखील ठामपणे आपला ठसा उमटवावा तसेच आपली प्रतिष्ठा सांभाळत आपल्या कामाशी एकनिष्ठ असावे असे सांगितले.
त्यांच्या प्रवासात कुटुंबीयांचा पाठिंबा किती महत्वाचा होता हे सांगत त्यांनी आपल्या समाजातील निराधार स्त्रियांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा देखील व्यक्त केली.प्रा.मंदार टिल्लू यांनी ही मुलाखत घेतली.विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रश्न विचारले.यावेळी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, सचिव प्रा.डॉ.प्रदीप ढवळ,प्राचार्या डॉ.हर्षला लिखिते तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.