ओळख रमजान : इफ्तार : रोजा सोडणे - इंजि.सादिक लुकडे  

CRIME BORDER | 15 September 2022 05:29 PM

रात्रीच्या अखेरच्या पर्वात उष:कालापूर्वीपासून सूर्यास्तापर्यंत कडकडीत ठेवलेल्या उपवासाला रोजा असे म्हणतात. हिवाळ्यात रोजाचा अवधी भारतात १२ तासांच्या आसपास, तर जून-जुलैमध्ये आलेल्या रमजानमध्ये हा कालावधी १५ ते १६ तासांपर्यंत जातो. एप्रिल-मे महिन्यात १४ ते १५ तास. या काळात अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबही गिळणे वर्ज्य असते. एकदा का "सहरी'ची वेळ संपली की काहीही खाता-पिता येत नाही. इतकेच काय, या काळात औषधही घेता येत नाही. परंतु जर कोणी रोजा तोडलाच तर त्या व्यक्तीस त्याचे प्रायश्चित्त करणे आवश्यक ठरते. प्रायश्चित्त म्हणून रोजा तोडणाऱ्या व्यक्तीस त्या रोजाच्या बदल्यात सलग ६० दिवसांचे रोजे दंड म्हणून ठेवावे लागतात. परंतु रमजानच्या सुरुवातीच्या पर्वात काही जण विस्मरणाने खाण्या-पिण्याची शक्यता असते. असे विस्मरणाने एखाद्या व्यक्तीने काही खाल्ले-प्याले तर त्याला मात्र प्रायश्चित्त घेण्याची आवश्यकता नसते. सवय नसल्याने रमजानच्या पहिल्या दोन-चार दिवसांत दुपारी तीन-चार वाजल्यानंतर थोडासा त्रास जाणवण्याची शक्यता असते. परंतु काहीही झाले तरी लोक सूर्यास्तापर्यंत रोजा तोडत नाहीत.   

 

दिवसभर तहान आणि भुकेने व्याकूळ झालेले शरीर आणि मन सायंकाळ व्हायची आणि सूर्यास्ताची आतुरतेने वाट पाहत असते. सूर्यास्तापूर्वीच "इफ्तार' अर्थात रोजा सोडण्याची तयारी सुरू होते. घराघरांतून लहान मुलेही रोजा ठेवतात तेव्हा त्यांचे आवडते खाद्यपदार्थ, फळे, सरबत, खजूर अशी रेलचेल असते. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे "इफ्तार'साठी खाद्यपदार्थ आणतात. प्रत्येक मशिदीतून इफ्तारची व्यवस्था केली जाते. सूर्यास्तापूर्वी मशिदीतच घराघरांतून खाद्यपदार्थ, फळे पाठवली जातात. अनेक जण आपल्या ऐपतीप्रमाणे असे पदार्थ घेऊन मशिदीत जातात. तसेच घरात इफ्तारसाठी बनवलेले पदार्थ शेजाऱ्यापाजाऱ्यांना आवर्जून पाठवले जातात. गोरगरिबांनाही आवर्जून खाऊ घातले जाते. एकाच पंगतीत, एकाच ताटात अनेक जण कोणताही आकस किंवा कोणताही न्यून वा मोठेपणा न ठेवता इफ्तार करताना दिसतात. इस्लामच्या समतेची बीजे या प्रसंगातून ठळकपणे दिसून येतात. सूर्यास्त झाल्यानंतर मशिदीच्या मिनारवरून किंवा माइकवरून "रोजा सोडण्याची वेळ झाली, आता रोजा सोडा,' अशी घोषणा केली जाते. रोजा सोडताना तोंडात पहिला घास घालण्याआधी एक दुआ उच्चारली जाते. ती अशी : "अल्लाहुम्मा लका सुम्तो, व बिका आमन्तो, व अलैका तव्वकलतो व अला रिजकिका अफतरतो, फतकब्बल मिन्नी'. अर्थात "हे अल्लाह, मी तुझ्यासाठी रोजा केला, माझे तुझ्यावर इमान (श्रद्धा) आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे व तू दिलेल्या अन्नानेच मी हा रोजा सोडत आहे. हे अल्लाह, माझ्या या सत्कार्याला कबूल कर.' 

 

प्रेषित मुहंमद (स.) यांच्या प्रथेनुसार प्रत्येक जण सर्वात आधी खजूर सेवन करून इफ्तार करतात. ज्या ठिकाणी मुस्लिम वस्त्या किंवा मोहल्ले आहेत त्याच्या आसपास सायंकाळी चारनंतर इफ्तारच्या वेळेपर्यंत विविध खाद्यपदार्थांचे, फळांचे, खजुराचे आणि इतर पेयांचे विक्रेते गर्दी करून असतात. या काळात बाजारात पाय ठेवायला जागा नसते. रोजा सोडण्याची वेळ झाल्यापासून मगरीबची अजान होईपर्यंत सर्वसाधारणपणे पाच-ते सहा मिनिटांतच इफ्तार आटोपली जाते आणि अजान संपताच सर्वजण मगरीबची नमाज अदा करण्यासाठी उभे राहतात. अलीकडच्या काळात फळे, खजूर, सरबत याचबरोबर तळलेले पदार्थ जसे भजी, टिकिया, समोसे वगैरे सेवन केले जातात. नमाजनंतर काही जण नेहमीचे जेवण घेतात,  तर काही लोक रात्रीच्या नमाजनंतर म्हणजे सर्वसाधारणपणे रात्री १० नंतर आपले जेवण घेतात. हे जेवण आपण नेहमी जेवतो तसेच असते. यात विशेष असे कोणतेही पदार्थ नसतात. फक्त इफ्तारनंतर आणि रात्रीही जास्तीत जास्त पाणी पिण्याचाही प्रयत्न रोजाधारक करतात.  

 

इफ्तारसाठी मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी आणि गोरगरिबांनाही बोलावण्याची पद्धत आहे. कारण प्रेषितांच्या म्हणण्यानुसार, "एखाद्या व्यक्तीस अापण इफ्तार करवली तर त्याला रोजामुळे जेवढे पुण्य मिळणार असेल तितकेच पुण्य आपल्यालाही मिळते.' त्यामुळे हे पुण्यकार्य करण्याची धडपड लोक करीत असतात. त्यासाठी इफ्तार पार्टी आयोजित करण्यात येते. परंतु दुर्दैवाने अलीकडच्या काळात राजकीय पक्षांनी यात शिरकाव केल्याचे जाणवते. गोरगरिबांऐवजी समाजातील मान्यवर, राजकीय व्यक्तींनाच आमंत्रण दिले जाते. अर्थात अशा मान्यवरांनी इफ्तारमध्ये येऊ नये असे नाही; पण इफ्तारचा राजकीय उपयोग करून घेणे घृणास्पद आहे. असा दिखावा, असे प्रदर्शन अल्लाहला पसंत नाही. परंतु रोजाधारक आपल्या हलाल (न्यायपूर्ण) कमाईतून इतरांनाही इफ्तारसाठी मदत करीत असेल, भुकेल्यांना जेवू घालत असेल तर त्या हेच्या पुण्यप्राप्तीत आणखी भर पडते.