स.पो.निरी.जयेंद्रकुमार भोयर यांची Great Visit या सदरातील प्रेरणादायी मुलाखत

CRIME BORDER | 25 September 2021 06:30 PM

ठाणे पोलीस आयुक्तलयातील परिमंडळ ४ अंतर्गत -शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो.निरि.गुन्हे.यांचा कार्यभार सांभाळत असलेले  स. पो. निरी. जयेंद्रकुमार भोयर यांची  Great Visit या सदरात राजेंद्र वखरे यांनी घेतलेली प्रेरणादायी मुलाखत 

मुलाखतकार : मिस्टर जयेंद्रकुमार भोयर  आपला जन्म कुठे व कधी झाला?

एपीआय भोयर : माझा जन्म नक्षलग्रस्त भाग असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील मुंडीपार या  छोट्याशा खेडेगावात दि.२७/११/१९७६ ला झालेला आहे.या गावाची लोकसंख्या हजार ते बाराशे एवढी आहे

मुलाखतकार : आपलं बालपण कुठे व कसं गेलं?

एपीआय भोयर : माझं बालपण माझ्या जन्मगावी गेलं.

मुलाखतकार : आपलं प्राथमिक व शालेय शिक्षण याबद्दल सांगा.

एपीआय भोयर : माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी पर्यंत स्वगावी मुंडीपार येथे झाले. तसेच माध्यमिक शिक्षण पाचवी ते सातवी पर्यंत गावाशेजारील पानगाव येथे झालेले आहे त्यानंतर आठवी ते दहावीचे शिक्षण कावराबांध याठिकाणी असलेल्या हायस्कूलमध्ये झाले.  पुढील अकरावी ते बारावीचे  शिक्षण विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज आमगाव येथे व पुढील महाविद्यालयीन कला पदवी पर्यंतचे शिक्षण सालेकसा मनोहरभाई  पटेल सीनियर कॉलेज येथे झाले आहे.

मुलाखतकार : आपण ज्या ठिकाणी राहतात तेथील भौगोलिक परिस्थिती कशी आहे.

एपीआय भोयर : गोंदिया जिल्हा भातासाठी व तलावासाठी प्रसिद्ध असून  ५० टक्के नक्षलग्रस्त भाग आहे. मी रहात असलेले गाव सुद्धा  नक्षलग्रस्त प्रभावित क्षेत्रात येते.

मुलाखतकार :साहेब आपण म्हणतात गोंदिया जिल्हा ५० टक्के नक्षलग्रस्त भाग आहे मग आपणास शिक्षण घेण्यासाठी काही त्रास झाला का?

एपीआय भोयर : नाही शिक्षण घेण्यासाठी असा कुठलाही त्रास मला झाला नाही व इतरांनाही होत नाही.

मुलाखतकार : आपल्या बालपणापासून शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आपण कोण कोणते छंद जोपासले थोडक्यात आपल्या आवडी-निवडी काय ते सांगा.

एपीआय भोयर : मला माझ्या लहानपणीच माझ्या वडिलांनी सांगितले होते की तू स्वतः तुझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे स्वतः शिक्षण घ्यायचं व पुढील दिशा ठरवायची. करिअर संदर्भात कोणावरही अवलंबून न राहता कुणाचाही भरवश्यावर राहायचं नाही जे काही करायचं आहे ते स्वतः करायचं आहे आणि ते मी पक्क माझ्या डोक्यात ठेवलं होतं. माझे वडील शेतकरी असल्याने त्यांना शेतातील कामे करून आमच्याकडे लक्ष देणे शक्य नव्हते मी सातवीत असतांना पासूनच त्यांना शेतीत मदत करीत होतो एवढेच नव्हे तर आमच्याकडे म्हशी होत्या त्या म्हशीचे दुध काढून विक्री करणे व त्यातून येणाऱ्या पैशांतून घर खर्च भागवणे ही कामे लहानपणापासूनच करत होतो. शालेय जीवनापासूनच मी काम करून पैसे कसे कमवावे हे माझ्या वडिलांकडून शिकलो. मी पदवीपर्यंतचे शिक्षण याच पद्धतीने घेतले.

मुलाखतकार : तुम्ही शेतात व घरी मदत करत असतांना तुम्हाला खेळायला वेळ मिळत होता का ? तुम्हाला कोणत्या खेळाची आवड होती.

एपीआय भोयर : मला लहानपणापासूनच खेळाची खूप आवड आहे मी कबड्डीपटू व कुस्ती पटूही आहे. आमच्याकडे जेव्हा प्रोढ कबड्डी टूर्नामेंट होत असत तेव्हा तेथे आवर्जून मी जात असे आठव्या इयत्ते पासूनच मला कबड्डी व कुस्तीची आवड निर्माण झाली होती.

मला आजही आठवतं की त्या काळामध्ये कबड्डी व कुस्तीची मला व माझ्या मित्रांना इतकी आवड होती की आम्ही त्या वेळेस ज्या ठिकाणी टूर्नामेंट असतील त्या ठिकाणी सायकलीवर जात होतो. पण यासाठी आम्ही एक गंमत करत होतो आम्ही सर्व मित्र शालेय दप्तर एका पानाच्या टपरीवर ठेवून द्यायचो आणि घरी मात्र सांगायचो की आम्ही शाळेत चाललो पण आम्ही शाळेत न जाता कबड्डी व कुस्ती खेळण्यासाठी जात होतो.

मुलाखतकार : तुम्हाला खेळाचा काय फायदा झाला?

एपीआय भोयर : मी सर्वांना सांगेन की आयुष्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येक वयात मैदानी खेळ खेळले पाहिजे त्यामुळे आपली शरीर संपदा चांगली राहते मला कबड्डी कुस्ती व इतर खेळामुळे खूप फायदा झाला असून माझी शरीरसंपदा खूप छान आहे. आजही मी दररोज सकाळी व्यायाम करीत असतो त्यामुळे मी फिट आहे.

एपीआय भोयर : तुम्ही पोलीस खात्यात आल्यानंतर आपणास व्यायाम करण्यासाठी वेळ मिळतो का किंवा आपण वेळ कसा काढता.

एपीआय भोयर: मी पोलीस दलात असल्याने व्यायामाला फार महत्त्व देतो कारण पोलीस जर तंदुरुस्त नसतील तर ते जनतेचे काय रक्षण करतील? म्हणून मी दररोज सकाळी दीड तास माझ्या स्वतःसाठी देतो या वेळेत व्यायाम प्राणायाम, योगासन, वगैरे करीत असतो.

मुलाखतकार : तुम्ही  गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त भागात राहून पोलीस दलात का यावसं वाटलं?

एपीआय भोयर : मी जेव्हा पोलीस खात्यात यायचं ठरवलं तेव्हा भंडारा जिल्हा होता गोंदिया जिल्ह्याची ओपनिंग झाली नव्हती.मी खूप विचार केला की आपण आयुष्यात काय केलं पाहिजे तेव्हा माझ्यासमोर पोलीस दलचं येत होतं कारण की पोलीस खात्यात राहून आपण समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देऊ शकतो त्यांची सेवा करू शकतो याची मला खात्री पटली होती एवढेच नव्हे तर पोलीस खात्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप चांगला आहे.इतर विभागही आहेत परंतु पोलीस हे लोकांच्या जास्त संपर्कात राहत असतात. पोलीस खात्यात नोकरी करून समाज कार्य करण्याची संधी मिळत असते.  याचा मला अभिमान आहे. 

मुलाखतकार :आपण कोणत्या वर्षी पोलीस खात्यात भरती झाला?

एपीआय भोयर : मी १२ नोव्हेंबर १९९८ ला पोलीस खात्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो.

मुलाखतकार :पोलीस खात्यात येण्यासाठी तुम्हाला कोणाचे मार्गदर्शन लाभले.

एपीआय भोयर : मी पोलीस खात्यात भरती होईपर्यंत मला कोणीही मार्गदर्शक भेटला नाही. परंतु स्पर्धात्मक पुस्तके वाचून मी पोलीस दलात भरती झालो आहे. प्रशिक्षणानंतर मी तीन वर्ष नक्षलग्रस्त आर्म आऊट पोस्ट धाबे पवणे येथे नोकरी केली. त्यानंतर नवेगाव बांध पोलीस स्टेशनला नेमणूक झाल्यानंतर त्या परिसरातील ए सी पी (माझ्या समाजातील) श्री गावराणे साहेब हे असल्याचे समजले. त्यांचं गावही नक्षलग्रस्त भागातच होतं. त्यांच्या गावात  त्यांच्या गावात आम्ही जेव्हा जायचो तेव्हा आम्हाला ते राहत असलेलं घर दिसायचं आणि कुणीही आम्हाला सांगायचे की हे एसीपी साहेबांचं घर आहे त्यावेळेस ते एसीपी होते पण त्यांचे घर खूप साध सुद्धा होतं. आम्ही त्यांचं घर बघून त्यांचा मानसन्मान बघून आम्हालाही असं वाटायला लागलं की आपणही एमपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी व्हायला पाहिजे.

मुलाखतकार :जेव्हा तुम्हाला वाटलं की आपण अधिकारी व्हावं तेव्हा आपण अभ्यास कसा केला.

एपीआय भोयर : मी गोंदिया येथे मुख्यालयाला असतांना  मला एमपीएससीच्या अभ्यासाची आवड नव्हती. मी आऊट पोस्ट ला तसेच सी -६० कमांडो लाही काम केले आहे. आऊट पोस्ट ला असताना आम्ही नेहमी बघायचं की जे अधिकारी आहेत ते नेहमी यूपीएससी व राज्यसेवेची परीक्षा देण्याची तयारी करीत असायचे.  वाचन करीत अभ्यास करीत असायचे त्यांना बघून - बघून आपण देखील अधिकारी व्हायचं आहेच हे पक्कं ठरवलं.यासंदर्भात मी माझ्या मिसेस शी बोललो तेव्हा तिने  मला खूप प्रेरणा व मोलाची साथ दिली. माझे मोठे साडू चंद्रशेखर चकाटे पोलीस निरीक्षक आहेत. त्यांचेही मार्गदर्शन मला लाभले. 

मुलाखतकार :आपण विवाह बंधनात कधी अडकला.

एपीआय भोयर: मी पोलीस खात्यात येऊन  ९ वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर माझ्या कुटुंबांने ठरवून माझा विवाह केला.

मुलाखतकार :आपण पोलीस खात्यात येईपर्यंतच श्रेय कुणाला द्याल.

एपीआय भोयर: लहानपणापासून तर पोलीस खात्यात भरती होईपर्यंतचे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांना जात पण त्यानंतर एमपीएससी व इतर पुढील शिक्षणासाठी मला मोलाची साथ मिळाली ती माझी अर्धांगिनी सौभाग्यवती माधुरी भोयर.  तिच्यामुळेच कारण तिने मला खूप मोलाची साथ दिली व मी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएसआय झालो त्याचे श्रेय माझ्या अर्धांगिनीला जातं.

मुलाखतकार :महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण पोलीस खात्यात आलात पण अधिकारी होण्यासाठी आपण कुठे सुरुवात केली अभ्यास कसा केला.

एपीआय भोयर: मी सी -६० ला होतो. तेव्हा आम्हाला वेपन तसेच जीवनावक्षक वस्तू घेऊन चार-पाच दिवसांसाठी जंगलात जावं लागत असे. तेव्हा आम्ही चार/पाच मित्र एमपीएससी  परीक्षेची तयारी करीत होतो. त्यावेळी पेट्रोलिंगला जायच्यावेळेस सोबत अभ्यासाचे पुस्तके घेऊन जात होतो जसा वेळ मिळेल तसा आम्ही अभ्यास करीत एकमेकांशी डिस्कशन करीत होतो. मला सांगताना आनंद होतोय की आम्ही चार मित्र एमपीएससी स्पर्धात्मक परीक्षेतुन पीएसआय झालो.  जर आपण मनाशी खूणगाठ बांधली तर यश आपल्याला नक्कीच मिळतं हे वरिष्ठांकडून आम्हाला सतत ऐकायला मिळत होतं. व ते खरंही ठरलं 

मुलाखतकार :तुमच्या कुटुंबात उच्चशिक्षित लोक किती आहेत

एपीआय भोयर : माझ्या घरातील मंडळीही ही शेतीवर अवलंबून असल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही माझ्या कुटुंबात मीच उच्च शिक्षण घेतलेले आहे.

मुलाखतकार : आपण एमपीएससी च्या परीक्षेच्या तयारीसाठी सुट्टी घेतली होती का? व किती दिवस?

एपीआय भोयर : मी या परीक्षेची तयारी कर्तव्य बजावून केली फक्त पंधरा दिवस तयारी साठी सुट्टी घेतली होती.

मुलाखतकार :एमपीएससी परीक्षा कठीण आहे का? आपण विद्यार्थ्यांना काय सांगाल?

एपीआय भोयर: तसं म्हटलं तर एमपीएससीची परीक्षा कठीण नाही फक्त  आपला निर्णय पक्का असावा लागतो आणि अभ्यास हा मन लावून केला तर यश नक्कीच मिळते आपणच स्वतः एमपीएससीचा अभ्यास खूप कठीण आहे.. कठीण आहे..  असे म्हणून आपण एक पाऊल मागे येतो पण तसे न करता विद्यार्थ्यांनी हसत-खेळत एमपीएससीची परीक्षा दिली तर यश हमखास मिळते हे आम्ही स्वतः अनुभवल़ आहे. आम्ही चारही मित्रांनी कुठेही क्लास लावलेला नव्हता सर्व अभ्यास आम्ही स्वतः पुस्तके मिळवून केला आहे मात्र आम्ही संदर्भीय पुस्तकं शहरातून कुरियर द्वारा मागवत होतो.आम्ही जेव्हा परीक्षेची तयारी करत होतो तेव्हा गोंदिया जिल्हा व परिसरात अशा काही सुविधा नव्हत्या एवढेच नव्हे तर जास्त ग्रंथालयही नव्हते. कोचिंग क्लासेस तर नव्हतेच.

मुलाखतकार :आपण एमपीएससीची परीक्षा कधी पास झालात.

एपीआय भोयर : सन २००७  ची परीक्षा होती सर्व प्रक्रिया होऊन मी २०११ साली पीएसआय  झालो.

मुलाखतकार : मुलाखतीची तयारी आपण कशी केली. यासाठी कुणाचे मार्गदर्शन लाभले का?

एपीआय भोयर : नाही यासाठी आम्हाला कुणाचेही मार्गदर्शन लाभले नाही पण आम्ही चारही मित्र खूप जिद्दी होतो आम्ही मागील काही प्रश्नपत्रिका मागवल्या होत्या व मुलाखतीला  कसे प्रश्न विचारतील काय होऊ शकतं  या संदर्भात डिस्कशन करून एकमेकांची आम्ही मुलाखत घेत होतो आम्हीच आमची तयारी करून घेतली आणि त्या परीक्षेत आम्हाला यश प्राप्त झाले.

मुलाखतकार :एमपीएससी नंतर तुमचं प्रशिक्षण कुठे झालं? व तुमची पहिली पोस्टिंग कुठे झाली.

एपीआय भोयर : माझं प्रशिक्षण नाशिक/तूरची (तासगाव जि .सांगली ) येथे झालं व मी फौजदार म्हणून सीताबर्डी येथे रुजू झालो. सन २०१४ पर्यंत मी सिताबर्डी ला होतो नंतर जरी पटका  पोलीस स्टेशन नागपूर सिटी येथे कार्यरत होतो.सन २०१५ ला माझी पदोन्नती सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून ठाणे सिटी येथे बदली झाली त्यानंतर  मानपाडा पोलीस स्टेशन येथे. सन २०१९ पर्यंत मी मानपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत होतो तेथून माझी बदली अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली. असून मी या ठिकाणी कार्यरत आहे.

मुलाखतकार : पोलीस खात्यातील आपले आदर्श कोण आहेत.

एपीआय भोयर : माझे  वरिष्ठ हे माझ्यासाठी नेहमीच आदर्शच आहेत आणि जे चांगलं काम करतात त्यांचं मी नेहमी अवलोकन करीत असतो. जे तत्त्वनिष्ठ अधिकारी आहेत त्यांचे नेहमीच मी मार्गदर्शन घेत असतो.ठाणे पोलीस आयुक्तालयात काम करतांना आमचे पोलीस आयुक्त मा. विवेक फणसळकर साहेब तसेच अप्पर  पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे साहेब तसेच डीसीपी . प्रशांत मोहिते साहेब व एसीपी . विनायक नरळे , वपोनि  . मधुकर भोगे यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असते . 

मुलाखतकार : तुम्हाला आतापर्यंत कोण कोण अधिकारी लाभले.

एपीआय भोयर: सीताबर्डी पोलीस स्टेशनला पहिले इन्चार्ज श्री . जाधव साहेब , त्यानंतर तेथे श्री .  जोशी साहेब त्यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले मी त्यांच्या तत्वावर आजही चालत आहे. त्यानंतर श्री . वेरणेकर साहेब मानपाडा येथे श्री . कब्द्दुले साहेब,श्री . अवसरे साहेब, शिवाजीनगर पोलीस स्टेशनला श्री . बग्गा साहेब , आता श्री . भोगे साहेब हे अधिकारी लाभले.

मुलाखतकार : आपण सर्व समाजातील विषेत:  जंगलात राहणाऱ्या गोर - गरीब जाती-जमातीतील युवक-युवतींनी काय करावं यासाठी काय मार्गदर्शन करील.

एपीआय भोयर : आदिवासी समाज हा डोंगराळ भाग व जंगल भागात वास्तव्यास आहे हा समाज खूप भोळाभाबडा आहे. त्यांच्यात अशिक्षितपणा जास्त आहे त्यांना प्रवाहात आणण्यासाठी शासनाने वस्तीगृह व आश्रम शाळा निर्माण केलेल्या आहेत याची सर्व माहिती जर शिक्षित लोकांनी किंवा आदिवासी समाजातील जे उच्च शिक्षण घेऊनमोठ्या पदावर कार्यरत आहेत त्यांनी दिली तर खूप मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंबातील  व आदिवासी भागातील मुलेही प्रशासनामध्ये येतील व त्यांच्या हातून समाजकार्य घडेल व समाजाची उन्नती होईल. त्यांच्यासाठी शिबिराचे आयोजन केल्या गेले पाहिजे त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे . वस्तीगृहात राहण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे शिक्षण घेतल्यानंतर अधिकारीपदासाठी त्यांना तयार केले पाहिजे.

मुलाखतकार :आदिवासी बांधवांसाठी तुम्ही काय करणार आहात.

एपीआय भोयर : समाज सुधारण्यासाठी हे कुण्या एकट्यादुकट्या चे काम नाही यासाठी अनेकांनी हातभार लावला पाहिजे आदिवासी समाजामध्ये एकूण पंचेचाळीस जाती आहेत त्या -त्या जातीतील लोकं  व संघटना ,एनजीओ व पुढारी तयार करून त्यांच्या समाजासाठी कामं केली  केलेच पाहिजे तरच आदिवासी समाजाची खऱ्या अर्थाने उन्नती / प्रगती होईल . 

मी हलबा हलबी या जातीत मोडतो आमच्या समाजातील काही  अधिकारी व कर्मचारी वर्गाने नागपूर येथे एक समाज भवन निर्माण ठरविले असून  वर्गणी गोळा करीत आहोत या समाज  भवनांत  गोर-गरिबांच्या मुलांना राहण्याची खाण्यापिण्याची व शिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल याठिकाणी मुख्यत्वे आयएएस, आयपीएस अधिकारी घडविण्यासाठी कार्य करण्यात येणार आहे याप्रमाणे इतर  इतरही स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन येथे करण्यात येईल असा आमचा सर्वांचा मानस आहे या  प्रमाणे इतर समाजातील लोकांनी हि काम करावे जेणेकरून आपल्या भारत देशाची प्रगती नक्कीच होईल .

मुलाखत कार: तुमचा एखादी स्मरणात राहिलेला तपास कोणता व कोणत्या पोलीस स्टेशनला घडला?

मुलाखतकार मी मानपाडा पोलीस स्टेशनला २०१७ ला असताना एका लहान मुलाच्या किडनॅपिंग चा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यात त्या मुलांवर लैंगिक अत्याचार करून त्याचा खून करण्यात आला होता ती केस आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासून आरोपींना गजाआड केले होते. त्या प्रकरणात आरोपी विरुद्ध कोणत्याही प्रकारचा सुगावा नसतांना तांत्रिक पुराव्याच्या आधारे सादर गुन्हा उघडकीस करून एका चिमुकल्या मुलाला  न्याय देण्यासाठी प्रयत्न केले . सादर गुन्ह्यात आम्हाला वरिष्ठांचे मोलचे मार्गदर्शन लाभले. 

मुलाखतकार व शब्दरचना : राजेंद्र श्रावण वखरे , डोंबिवली - संपर्क - ९६१९६३००३५/९९८७४९६१३६