माझ्या आईचे इच्छामरण - कशाला गेली आई तू स्वर्गाला ! कोण वागवेल तुझ्या या बाळाला.सोडूनि का गेली तुझ्या या पाखराला - भाव मनीचे- सपोनि.प्रशांत आंधळे

CRIME BORDER | 9 October 2021 06:30 PM

क्राईम बॉर्डर - ब्लॉग -  माझी आई कै.आसराबाई आबासाहेब आंधळे ८ वर्षांपासून स्वर्गात राहाते.- आई!!! ऐकतेय ना? आजही आठवतात ते दिवस- आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार,आई देवापाशी मी गं तुला जन्मोजमी मागेन  भाव मनीचे- सपोनि.प्रशांत आंधळे-ब्लॉग- आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मुर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही.

 

माझ्या आईचा जन्म सन १९६०  मध्ये मु.पो.आव्हाडवाडी, ता.जि.अहमदनगर येथे एका सधन कुटुंबात झाला.त्याकाळी आमचे आजोबा पंचक्रोशीतील सदन शेतकरी होते. १०० एकर पेक्षा जास्त जमीन असलेले आजोबा यांच्या पोटी माझ्या आईने जन्म घेतला. 

 

आईचे लहानपण खूप मजेत गेले आजोबांना मुलगा नसल्याने त्यांनी आईस मुलाप्रमाणे वाढवले, त्याकाळी लवकर लग्न होत असल्याकारणाने माझ्या आजोबांनी १९७३ साली माझ्या आईचे लग्न माझ्या वडिलांशी जमवले परंतु आमच्या काही नातेवाईकांना आईचे लग्न हे प्रॉपर्टीसाठी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांशी लावून देणे असल्याकारणाने त्यांनी या लग्नाला विरोध केला, तरीही माझ्या आजोबांनी ह्याच मुलाशी माझ्या मुलीचे लग्न लावून देणार असे सांगितले. माझे वडील हे त्याकाळचे पदवीधर तसेच सधन व उच्च शिक्षित कुटुंबातील होते.  त्यांचे लग्न जमले परंतु आमच्याच काही नातेवाईकांनी मुलीचे वय कमी आहे, असे सांगून त्याकाळी पोलीसात तक्रार करून लग्न अडवण्याचा प्रयत्न केला.

 

त्यावेळी आमच्या आजोबांनी आमच्या आई-वडिलांचे त्र्यंबकेश्वर येथे जाऊन लग्न लावून दिले. त्यानंतर खऱ्या त्रासाला सुरुवात झाली ,कारण आमच्या जवळच्या नातेवाईकाने माझ्या वडिलांना आईला त्रास देण्यास सुरुवात केली, त्यांना वाटे यांना गावातून काढून दिले तर सर्व प्रॉपर्टी आमची होईल म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना त्रास दिला. १९७९ मध्ये आजोबांचे निधन  झाले.

 

आजोबांनी सर्व प्रॉपर्टीची देखभाल करण्यासाठी माझ्या वडिलांना सरकारी नोकरीचा राजीनामा देण्यास लावला , त्यानंतर माझ्या मावशीचे लग्न आमच्या नातेवाईकात झाल्याने व ते शेजारी असणाऱ्या गावातील असल्याने आमच्या दुसऱ्यां नातेवाईकांनी सगळ्यांनी मिळून प्रॉपर्टीसाठी आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली.

 

तरीही आई-वडील हे खंबीर पणाने न डगमगता गावात राहिले . त्यावेळी माझ्या वडिलांना मारण्याच्या सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या, परंतु वडील न डगमगता न घाबरता गावात  राहिले .त्यावेळी आम्हाला गावच्या लोकांनी खूप मदत केली.  आमची आई व मावशीत प्रॉपर्टी साठी नातेवाईकांनी वाद लावून दिला,  व सगळ्या प्रॉपर्टीला स्टे देण्यात आला.

 

एक काळ असा आला की एव्हढी सगळी प्रॉपर्टी असून सुद्धा आमची परिस्थिती खालावली होती. वडिलांनी सरकारी नोकरी सोडली होती तसेच वादामुळे त्यांना काही व्यवसायही करता येत नव्हता, चांगले रहाणीमान, असल्याने तसेच सगळ्या जमिनीला स्टे असल्याकारणाने उत्पन्न नाही अशा परिस्थितीमध्ये परिस्थितीत खालावली असतांना ही माझ्या आईने न डगमगता आम्हाला शिकवलं, आयुष्यात कधीही खोटं न बोलणारी माझी आई हिने  आयुष्यात कोणालाही कधी फसवले नाही.

 

मरेल परंतु दिलेला शब्द तोडणार नाही आशा स्वभावाचे होती, मी व माझा भाऊ अहमदनगर येथे कॉलेजला असतांना माझ्या आईला खूप वाईट वाटत होते की , तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टी चा उपयोग तिच्या मुलांसाठी तिला करता येत नसल्याने तिला दुःख होई, परंतु त्यामुळे आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले.

 

आईचा स्वभाव खूप कडक असल्याकारणाने तिचा गावातही एक आदरयुक्त दरारा होता. तिचा कोणी शब्द कोणी टाळत नसे.ती  सतत गोरगरीबांना मदती साठी  तयार असे,  एक वेळच प्रसंग असा की,  आमच्या गावातील  हरिजन समाजाचा एक माणूस आमच्या वाड्यावर आला व त्याने  आईला घरात काहीच नाही असे सांगून धान्य मागितले आमचीही परिस्थिती ठीक नसल्याने आम्ही बाहेरून धान्य आणलं होतं आणि तिने सगळं धान्य त्यांना देऊन टाकले  त्यावेळी आम्ही बोललो की ,आई आपली परिस्थिती पहिल्यासारखी नाही तू परोपकार  बंद कर त्यावेळी ती बोलली आपल्याकडे हे लोकं काम करीत होते ते अपेक्षेने येतात,आपल्याला कोणीही देऊ शकतं परंतु त्यांना कोणी देणार नाही. असे तिच्या जीवनात खूप प्रसंग आले परंतु तिने प्रत्येक वेळेस गरिबांना मदत केली व आमच्या वाड्यावरून मदतीस आलेला कधीही आईने विना मदत परत पाठवला नाही.

 

माझ्या आईचे स्वप्न होते की,आम्ही दोघा भावांनी फौजदार व्हावे व माझ्या वडिलांचे स्वप्न होते की दोघातील एकाने तरी वकील व्हावे मी व माझा भाऊ नचिकेत दादा असे दोघे जणं अहमदनगर येथे कॉलेजला होतो. माझा भाऊ नचिकेत दादा याने पदवी पूर्ण करून एल.एल.बी. ला ऍडमिशन घेतले, तसेच मी कॉम्प्युटर सायन्सला होतो ,परंतु आईचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा दोघा भावांच्या मनात सतत होती. त्याकाळी पीएसआयच्या जाहिराती दोन-दोन तीन-तीन वर्षे येत नसल्याने भाऊंनी एमपीएससीची तयारी सुरू केली परंतु एमपीएससीच्या वेळेवर जाहिरात येत नसल्या कारणाने खात्यांर्गत परीक्षा देण्यासाठी पोलीस मध्ये भरती झाला.त्यावेळी  मी ही माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले केले, परंतु आईची इच्छा पूर्ण करण्याची जिद्द मनात होती भाऊ नंतर दोन वर्षातच मी ही पोलीस मध्ये भरती झालो. त्यानंतर आम्ही दोघा भावांनी पोलीस खात्यात नोकरी करत करत अभ्यास सुरुवात ठेवला. दरवर्षी प्री परीक्षा पास व्हायचं व मुख्य परीक्षेला नोकरी करत असतांना कमी टाईम मिळत असल्यामुळे बाहेर पडायचो, त्यावेळी खूप दुःख होई परत मी जोमाने अभ्यासाला सुरुवात करायचो असे नोकरी करत-करत ४/५ वर्ष  चालू होते. सन २००९ रोजी भाऊ  परीक्षा पास झाला व त्याची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली.त्यावेळी माझ्या आईचा आनंद गगनात मावत नव्हता, त्यावेळी तीने गावा मध्ये पंचवीस किलो पेढे वाटले.

 

परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही ,पुढील काही दिवसातच आईला कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले, त्यावेळी आम्ही दोघे भाऊ खूप रडलो व त्या वर्षीच्या परीक्षेत मी फक्त २ मार्क्सनी फायनल ला बाहेर पडलो, त्यावेळेस भाऊ पोलीस उपनिरीक्षक च्या ट्रेनिंग करता नाशिक येथे गेला व आईची जबाबदारी माझ्यावर पडली मी त्यावेळेस मुंबई येथून प्रत्येक साप्ताहिक ला गावी जाऊन आईची काळजी घेत होतो, तसेच भाऊ प्रत्येक रविवारी नाशिक वरून गावी येऊन आईची काळजी करायचा तसेच माझे वडील ही आईची खूप काळजी करत होते परंतु केमोथेरपी व कॅन्सर वरील ट्रीटमेंट मुळे आईची तब्येत खूप खालावली होती.ऑपरेशन होऊन आईच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती. जानेवारी २०१२ मध्ये आईला पुन्हा त्रास होऊ लागल्याने आईला पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटल येथे ऍडमिट केले. त्यानंतर जानेवारीपासून आईवर उपचार सुरू झाले, त्यावेळी मी नोकरी न जाता मी माझ्या आईच्या जवळ सह्याद्री हॉस्पिटल येथे राहिलो.भाऊ प्रत्येक रविवारी आईला भेटण्यास नाशिक वरून पुण्याला येत असे तसेच वडील व मी असे मिळून आईची काळजी घेत होतो.

 

त्यादरम्यान फेब्रुवारीमध्ये मी दिलेल्या फौजदार च्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन मला फिजिकल टेस्ट साठी बोलावण्यात आले. त्यावेळी आईने मला हॉस्पिटलमध्ये पेढे वाटण्यात सांगितले मी बोललो की,अगोदरही चार परीक्षा दिल्या आहेत त्यावेळी काम झाले नाही तर सिलेक्शन होण्या अगोदरच पेढे कसे काय वाटू. त्यावेळी ती,बोलली या वेळेस तुझी पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड होणारच आहे, परंतु मी पाहण्यास नसेल म्हणून आत्ताच पेढे वाट.

 

त्यावेळी आई मला रोज फिजिकल च्या तयारीसाठी  सह्याद्री हॉस्पिटल वरून सकाळी व संध्याकाळी असे दोन टाईम शिवाजीनगर येथील पोलीस ग्राउंड येथे पाठवत असे, या वेळेस तुला माझी इच्छा पूर्ण करायची आहे असे सांगून  तयारी कर अशी बोलली. रोज मी हॉस्पिटलमधून सकाळी व संध्याकाळी असं दोन टाईम फिजिकल ची तयारी करत असे त्यानंतर काही दिवसात आईला रुबी हॉस्पिटल येथे शिफ्ट करण्यात आले त्यावेळी मला रोज रुबी हॉस्पिटल येथून तयारीसाठी शिवाजीनगर पोलीस ग्राउंड येथे पाठवत असे व तिला कळून चुकले होते की ती आता जगणार नाही, तसेच तिने मला बजावून ठेवले होते की, मी  मेल्यानंतर ही तू फिजिकल ची तयारी बंद करणार नाहीस म्हणून तिने मला सांगून ठेवले व  मेल्यानंतर तू लवकरच लग्न कर, मी तुझ्या पोटी  एका वर्षाच्या आत जन्माला येईल‌ असे आईने सांगितले.

 

त्यानंतर आई कोमामध्ये गेली व मी माझ्या फिजिकल ची तयारी करत असतांना अभ्यास पण करत होतो, कारण पुढील वर्षीच्या  पीएसआय प्री एक्झाम ही दि ०८/०४/२०१२ ला होती व दिनांक ०५/०४/ २०१२ रोजी रुबी हॉस्पिटल च्या डॉक्टर ने मला शेवटचे ७२ तास असल्याचे सांगितले,त्यानंतर मी आईच्या रूममध्ये जाऊन आईचा हातात हात घेऊन बोललो की, या  एक्झाम मध्ये काम नाही झाले तर पुढील एक्झाम ही ०८ एप्रिल ला आहे आणि रडत बसलो त्यावेळी आईने कोमात असून सुद्धा  हात वर उचलून जोरात खाली आपटला, माझी एक्झाम मुंबईला असल्या कारणाने माझी मुंबईला येण्याची इच्छाच होत नव्हती व आईचं कधी काय होईल हे ही सांगता येत नव्हतं.

 

त्यामुळे मी  दिनांक ०८/०४/२०१२  रोजी सकाळी पाच वाजेपर्यंत पुण्यातच होतो. शेवटी वडिलांनी मला तू परीक्षेला जा आम्ही आहोत असे बोलले  मी सकाळी पाच वाजता मुंबईला  पीएसआय पूर्व परीक्षा देण्यासाठी आलो व मुंबई येथे पूर्व परीक्षा देऊन लगेच घाईने रेल्वेने पुण्याला पोहोचलो व सायंकाळी ०६.३० वाजण्याच्या दरम्यान रुबी हॉस्पिटल येथे गेलो,असता दिवसभर भरपूर पाहुणे येऊन भेटत होते, काही गेले होते, काही तेथे होते भाऊ पण आला होता.

 

त्यानंतर मी सगळ्यांना भेटलो व भाऊ ही नाशिक येथे निघाला व इतर पाहुणे अहमदनगर येथे निघाले सगळे गेल्यानंतर मी आईच्या  रूममध्ये गेलो व आईचा हात हातात घेऊन बोललो की,माझी परीक्षा चांगली गेली असून मी या वेळेस नक्कीच फौजदार होणार असं बोललो आणि लगेचच आईची ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ लागली.त्यावेळेस मी डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी मला लगेच बाहेर जाण्यास सांगितले आणि आम्ही काही करू शकत नाही असे सांगितले आणि दहाच मिनिटांमध्ये आईने तिचा प्राण सोडला,  त्यानंतर  आईचा अंत्यविधी गावी झाला.त्यानंतर मी रोज  सकाळी चार वाजता उठून  फिजिकल ची तयारी करून गाव झोपेतून उठण्याच्या आत मध्ये येऊन परत पुन्हा घरात झोपत असेल जेणेकरून लोकं मला नाव ठेवणार नाही परंतु मला आईची इच्छा पूर्ण करण्याची संधी सोडायची नव्हती. तेराव्याचा विधी झाल्यानंतर मी लगेच  मुंबई ला आलो व तयारी सुरू केली  व काही दिवसात  मी  चांगल्या मार्गाने फिजिकल परीक्षा पास होऊन अंतिम  यादीत फौजदार म्हणून माझे सिलेक्शन झाले.त्यामुळे आनंद झाला की दुःख हेच कळत नव्हतं.

 

एकंदर आईच्या जीवनातील संपूर्ण प्रवास आठवला त्या वेळेस खूप रडलो. आज आम्ही दोघा भावांनी आमच्या आईचे स्वप्न पूर्ण केले परंतु  ते सुख अनुभवायला  ती राहिली नाही, याचं दुःख सतत मनात तेवत आहे . 

आज सगळे असून सुद्धा आईची कमतरता सतत क्षणोक्षणी जाणवते. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आई आपले मरण ही पुढे ढकलू शकते. त्यानंतर सहा महिन्यातच मी लग्न केले व एका वर्षाच्या आत मध्ये मला मुलगा झाला. तो ही आईप्रमाणेच डाव्या हाताचा हनुवटीवर तीळ व कडक स्वभावाचा.

 

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 

आम्हां दोघा भावास आमच्या आईचा सार्थ अभिमान आहे.अशा महान आईने आम्हास जन्म दिला.माझा भाऊ नचिकेत याने औरंगाबाद येथे ५ वर्ष नोकरी केली असून त्याने त्या ठिकाणी पोलीस स्टेशन व  सायबर क्राईम ब्रँच येथे खूप चांगले काम केले आहे, तसेच मुंबई या ठिकाणी सुद्धा ४ वर्ष खूप चांगले काम केले असून त्यास मा. पोलीस आयुक्त मुंबई व औरंगाबाद यांनी बक्षिसे व प्रशांसापत्र देऊन त्याच्या कामाचा गौरव केला आहे. 

 

तसेच मी ही आईचे उपदेश सतत मनात ठेऊन काम करत आहे.जेणे करून माझे आई व वडील यांना आमच्यावर गर्व राहील व त्यांचे प्रतिष्ठेला कधीही तडा जाणार नाही याची काळजी घेत असतो.

 

आज मी प्रशांत आबासाहेब आंधळे, सहायक पोलीस निरीक्षक म्हणून शिवाजीनगर पोलीस स्टेशन, अंबरनाथ ,ठाणे पोलीस आयुक्तालय या ठिकाणी व माझा भाऊ नितीन (नचिकेत )आबासाहेब आंधळे, सहायक पोलीस निरीक्षक म्हणून बांगुरनगर पोलीस स्टेशन, मुंबई येथे कर्तव्य करत आहोत.

 

शब्दांकन: सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे ,अंबरनाथ पोलीस स्टेशन, ठाणे पोलीस आयुक्तालय मोबाईल नंबर - ८८८८०८११३३